बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी खिडकीला दोर बांधला... सहाव्या मजल्यावरून पडून १६ वर्षांची मुलगी जखमी!

 
मुंबई : मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रियकरासोबत मुली पळून जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असला तरी काही अल्पवयीन मुलींनासुद्धा लग्नाची प्रचंड घाई होत असल्याचे चित्र आहे. १५-१६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसुद्धा लग्न करण्यासाठी घरातून पळ काढत आहेत. मुंबईत असेच एक प्रकरण समोर आले आहे. १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्रयत्न फसला. प्रियकरासोबत जाण्याऐवजी तिला रुग्णालयात भरती व्हावे लागले...
त्याचे असे झाले, की वर्सोवा भागात राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलीचे एका तरुणावर प्रेम होते. तिच्या बॉयफ्रेंडसोबत बोलत असताना तिला घरच्यांनी पाहिले. त्यामुळे यापुढे घरातून बाहेर पडायचे नाही, अशी ताकीद तिच्या आई- वडिलांनी तिला दिली आणि घरात कोंडून टाकले. त्यामुळे तिने घरातून पळून जायचे ठरवले. तिने कपडे बॅगमध्ये भरले. घरातील साड्या एकमेकांना बांधून त्याचा दोर तयार केला. तो दोर घरातील एसीच्या एका टोकाला बांधला आणि त्या दोराच्या सहाय्याने ती सहाव्या मजल्यावरून उतरू लागली. मात्र नियंत्रण सुटल्याने ती कोसळली व गंभीर जखमी झाले. अखेर सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.