व्वा! मानलं... डीजे परवानगीची सूचना दवंडीद्वारे , जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला असाही दुजोरा..
May 3, 2024, 14:29 IST
पिंपळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आणि आक्षेपार्ह गाण्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस विभाग, आरटीओ विभागाद्वारे डीजे धारकांवर कारवाई सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सुद्धा याबाबत दिशा निर्देश जारी केलेले आहेत. त्यामध्ये डिजेंवरील आवाज, गाणी यांवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यासोबतच डीजेसाठी परवानगी बंधनकारक असल्याची महत्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे. कुठल्याही शुभप्रसंगी डीजे लावायचा असेल तर किमान सात दिवसा आधी जवळच्या पोलीस ठाण्यातून परवानगी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या याच आदेशाला आता गाव खेड्यातून देखील दुजोरा मिळताना पाहायला मिळतोय. बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा गावात एका ग्रामस्थाने थेट दवंडीद्वारे ही सूचना सगळ्या गावात पोहोचवली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा असाही प्रसार झाल्याने गावोगावी ग्रामस्थांमध्ये सतर्कता पाहायला मिळतेय..