पाण्यासाठी टाहो फोडत महिला धडकल्या पालिकेवर
Updated: Jan 30, 2024, 10:14 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक रेखा प्लॉट भागातील महिलांनी पाण्यासाठी टाहो फोडत काल येथील नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी न.प. प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आठ दिवसांच्या आत या भागात नवीन नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली.
जाहिरात 👆
रेखा प्लॉट भागातील नागरिकांना नेहमीच पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. या भागात पाण्याची समस्या जटील बनली आहे. याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढत आहे. पण अद्याप पाण्याची कायमस्वरुपी सोय झाली नाही. पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. मात्र याद्वारे कुणालाही नळ कनेक्शन देण्यात आले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. काल ,२९ जानेवारीला संतप्त महिलांनी मोर्चा काढून पाण्याच्या समस्येकडे पालिकेचे लक्ष वेधले.आठ दिवसांत घरोघरी नळ कनेक्शन देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.