भाचीसोबत का बोलतो म्‍हणून तरुणाला बेदम मारहाण

शेगाव तालुक्‍यातील घटना
 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाचीसोबत का बोलतो असा जाब विचारून दोघांनी २३ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला आहे. ही घटना बाळापूर रोडवरील वनविहार ढाब्याच्या मागील शेतात (ता. शेगाव) ५ नोव्हेंबरला दुपारी दीडच्या सुमारास घडली.
स्वप्नील डिगंबर घाटोळ (रा. माळीपुरा, फुलेनगर शेगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मंगेश पल्हाडे व उमेश पल्हाडे यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. स्वप्नील कामधंदा नसल्याने सोयाबीन काढण्याचे काम महिनाभरापासून करत आहे. मंगेश पल्हाडे व तो सोयाबीन काढण्यासाठी शेगाववरून बाळापूर रोडने शेतात गेला. यावेळी मंगेश दारू पिलेला होता. त्याने स्वप्नीलला "तू माझ्या भाचीसोबत का बोलतोस?' असा जाब विचारला. स्वप्नील त्याला समजावून सांगत असतानाच मंगेश व त्याचा भाऊ उमेश यांनी शिविगाळ सुरू केली. त्यानंतर दगड व तुरीची काठी हातात घेऊन तोंडावर, पाठीवर, पोटावर, डाव्या पायावर स्वप्नीलला मारहाण केली. त्यानंतर दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. स्वप्नील शेतातून वनविहार धाब्यापर्यंत चालत आला. त्याने पत्नी व घरच्यांना फोन करून माहिती दिली. स्वप्नीलच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगेश व उमेशविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास शेगाव शहर पोलीस करत आहेत.