वाघोबा नेमका गेला कुठं? शोध घेऊन वनविभाग थकला!!

 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीनदा दिसूनही गायब होणारा वाघोबा सध्या खामगावकरांना दहशतीखाली ठेवून आहे. कधी तो हल्ला करेल याचा नेम नसल्याने नागरिक एकटेदुकटे फिरतानाही काळजी घेत आहेत. दुसरीकडे वनविभागाला सलग तिसऱ्या दिवशीही वाघोबाचा थांगपत्ता लागलेला नाही. बुलडाणा आणि अमरावतीहून रेस्‍क्‍यू पथके बोलावली आहेत, त्‍यांनी जिकडे वाघ दिसला तिकडे शोधमोहीम हाती घेतली, पण उपयोग झाला नाही. आता पथकेही थकली असून, वाघाची शोध मोहीम थांबवायची का, यावर निर्णय घेण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

कधी कधी दिसला वाघ....

  • ४ डिसेंबरला ४ वाजून २७ मिनिटांनी सर्वांत आधी वाघ दिसला तो खामगावच्या सुटाळपुरा भागात. गाडगे बाबानगरात सौ. भागिरथीबाई उमाळे यांना वाघ दिसला. याच भागातील रहिवासी प्रा. राजपूत यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात तो कैद झाला होता.
  • दुपारी चारला डीपी रोडवरील राजेश बुंदेले यांच्या शेतातील झुडुपात वाघ दिसून आला. बुंदेले यांनी तातडीने पोलीस आणि वनविभागाला माहिती दिली.
  • मध्यरात्री १२ ला आईसाहेब मंगल कार्यालयाजवळील पेट्रोलपंपाजवळ उपविभागीय अधिकारी श्री. जाधव यांना वाघ दिसून आला.

वनविभागाचे प्रयत्न...
सुरुवातीला हा वाघ आहे की बिबट्या याबद्दल संभ्रम होता. मात्र नंतरच्या तपासात, निरिक्षणातून तो वाघच असल्याचे समोर आले. त्यामुळे वनविभागही हादरून गेला. खामगाव शहरात अलर्ट जारी करून शोध मोहीम हाती घेण्यात आली. बुलडाणा, अमरावतीहून रेस्‍क्‍यू पथके बोलाविण्यात आली. बुंदेले यांच्या शेतात ट्रॅप लावण्यात आला होता. मात्र वाघाला पकडण्यात अपयश आले. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असताना वाघ आईसाहेब मंगल कार्यालयाजवळ दिसला. तिथे वनविभागाची पथके पोहोचेपर्यंत तो गोपाळनगर, रावणटेकडी घरकुल परिसराकडे गेल्याचे सांगण्यात आले. त्‍यामुळे काल, ५ डिसेंबरला रावणटेकडी, अमडापूर नाका, डंपिंग ग्राऊंड परिसरात वाघोबाचा शोध घेण्यात आला. मात्र काल दिवसभरात वाघाचा पत्ता कुठे लागला नाही. आता वनविभागही संभ्रमात पडले असून, वाघ खामगाव शहरात आहे की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. वाघाच्‍या शोधार्थ तीन पथके पिंपळगाव राजा, माटरगाव परिसरात पाठवल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.