शांत अन् संयमी योगेंद्र गोडे शेतकऱ्यांसाठी आक्रमक होतात तेव्हा...!
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऐन रब्बी हंगाम सुरू असताना वीज महावितरण शेतकऱ्यांना संकटात टाकत आहे. अवास्तव वीज बिल आकारून बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. शेतकरी मेला तरी गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला देणेघेणे नाही. ५ दिवसांत बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडले नाही तर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू. कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरू, असा खणखणीत इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांनी आज, ३ डिसेंबरला मोताळ्यातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात दिला. मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात दोन तास धरणे आंदोलन केले. शांत अन् संयमी अशी ओळख असलेल्या गोडेंचा आक्रमकपणा पाहून महावितरणचे अधिकारीही हैराण झाल्याचे चित्र दिसून आले. ५ दिवसांत तोडलेले वीज कनेक्शन जोडू, असे लेखी आश्वासन घेतल्यानंतरच गोडेंनी आंदोलन स्थगित केले.
आज सकाळी ११ वाजता योगेंद्र गोडे शेकडो शेतकऱ्यांसोबत मोताळ्यातील महावितरण कार्यालयात पोहोचले. अतिवृष्टीची मदत अजून शेतकऱ्यांना पोहोचली नाही. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊनही भरपाई देण्याऐवजी पैसे वसूल करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. वीज कनेक्शन तोडल्याने गहू, हरभरा पिकवणारा शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. आम्ही कायदा हातात घेतला तर तुम्हाला परवडणार नाही. त्यामुळे ५ दिवसांत वीज कनेक्शन जोडा. जळालेले विद्युत संच त्वरित बदला. अन्यथा शेतकरी तुमच्या कार्यालयात आत्मदहन करतील. शेतकऱ्यांच्या जीवाचे बरे वाईट झाले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, असे गोडे म्हणाले.
गोडेंचा संताप पाहून अधिकाऱ्यांनी ५ दिवसांत वीज जोडणी करू, असे आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी मोताळा तालुकाध्यक्ष यशवंतराव पाटील, माजी तालुकाध्यक्ष मनोहरराव नारखेडे, नीनाजी घनोकार, तालुका सरचिटणीस वैभव इंगळे, प्रभंजन पाटील, विशाल व्यवहारे, रामेश्वर गव्हाड, विकास नागवे, स्वप्निल ठोंबरे, भागवत पहुणे, विष्णू सपकाळ, प्रविण मोताळकर, सोपान इंगळे, सिद्दीक किलकिल, नितीन गवई, गणेश पाटील, गजानन माताळे, सोहम झाल्टे, अमोल रुमाले, अमोल वाडे, संतोष जोहरी, गोपाल राजगुरे, मोहित भंडारी, संदीप वणारे, हसन शाह यांच्यासह भाजपा पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.