Amazon Ad

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गाव मोठ्या संकटात? ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष ! ग्रामस्थांचा आरोप..

 

संग्रामपूर (स्वप्निल देशमुख : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) संग्रामपूर तालुक्यातील वानखेड हे गाव अतिशय संकटात सापडलं आहे. या गावात राहणाऱ्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येते. पावसाळ्यामुळे गावातील रस्त्यात जागोजागी डबके साचले. घाणीचे साम्राज्य देखील विस्तारत चालले आहे. यामुळे सर्दी, पडसे, खोकला, ताप अश्या आजारांनी अनेकजण त्रस्त आहेत. दरम्यान, ही अतिशय गंभीर बाब असून ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. 

 वानखेड येथील नाल्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे नाल्यातील घाण पाणी बाहेर ओसंडून वाहते. पावसामुळे जागोजागी डबके साचले असून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे ग्रामस्थ सांगतात. असे असताना ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीने अस्वच्छतेची बाब लक्षात घेतली नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. एवढेच नाही तर, ग्रामविकास अधिकारी कार्यालयात हजर राहत नाही. ते बाहेरगावी राहतात. त्यामुळे ते वेळेवर व नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचत नाही. त्यांच्या असक्षम कार्यपद्धतीमुळे गावाचा विकास खुंटला आहे. विविध कामांसाठी ग्रामपंचायतीत येणाऱ्या ग्रामस्थांची निराशा होत असल्याचे वानखेड ग्रामस्थ म्हणाले.