वनविभागाला वारंवार चकमा देतोय वाघोबा!; शोध सुरूच आहे...
४ डिसेंबर रोजी बुंदेले यांच्या शेतात वाघ असल्याची बातमी मिळताच वनविभागाने शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी ५ च्या सुमारास वनकर्मचाऱ्यांना पुन्हा वाघाचे अस्तित्व दिसून आले. मात्र शोधमोहिमेदरम्यान अंधार पडल्याने शोधकार्यात अडचणी आल्या होत्या. लोकवस्ती असल्याने या भागात कलम १४४ सुद्धा लागू करण्यात आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास आई साहेब मंगल कार्यालयाच्या परिसरात वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार तीन टीम त्या परिसरात शोध घेत होत्या. मात्र अंधार असल्याने वाघाला रेस्क्यू करता आले नाही.
५ डिसेंबर...
५ डिसेंबरच्या पहाटे पावणे दोनच्या सुमारास नगर परिषद शाळा क्र. ३ परिसरात वाघ नजरेस पडला. मात्र अंधार असल्याने त्याला रेस्क्यू करता येणे शक्य झाले नाही. सकाळी संपूर्ण परिसरात शोध घेऊनही हाती काहीच आले नाही. रावण टेकडी परिसर, घरकुल परिसर, पकड देवी, फुकटपुरा, म्हाडा कॉलनी, शिवाजी वेस, गोरक्षण रोड या सर्व भागात तसेच अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे शोध घेतला. मात्र वाघाच्या पाऊलखुणा सुद्धा मिळाल्या नाहीत. ज्ञानगंगा अभयारण्याकडे जाणाऱ्या सर्व पाऊल वाटांवर पथके पाठवून पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही आढळले नाही. ज्ञानगंगा अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या वाटांवर २० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. मात्र वाघाचे अस्तिव दिसले नाही.
६ डिसेंबर...
६ डिसेंबरला सुद्धा दिवसरात्र शोध घेऊन वाघाचे अस्तित्व दिसले नाही.
७ डिसेंबर...
काल, ७ डिसेंबर रोजी गोरक्षण रोड भागातील एका गोठ्यात गाईचे वासरू ठार करण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रथम दर्शनी मृत वासराच्या अंगावर, मानेवर कोणत्याही वन्यप्राण्यांचा खुणा आढळून आल्या नसल्याने वाघानेच शिकार केली असे म्हणता येत नाही, असेही वनविभागाने स्पष्ट केले. मृत वासरू आढळलेल्या ठिकाणी वासराचे मृत शरीर जागेवर ठेवून त्या भोवती ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. मात्र वाघाचे अस्तित्व दिसून आले नाही.
८ डिसेंबर...
आज, ८ डिसेंबर रोजी सुद्धा दिवसभर या भागात वनविभागाच्या बुलडाणा व अमरावतीच्या ७० जवानांनी शोधमोहीम राबविली. वृत्त लिहीपर्यंत रात्री पावणेअकरापर्यंत सुद्धा विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत होती. मात्र अद्याप वाघोबा रेस्क्यू करता आला नसल्याचे सांगण्यात आले.
अफवांवर विश्वास ठेवू नका...
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. वाघाचा शोध घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. खामगाव, मोताळा व घाटबोरी वनपरिक्षेत्रातील ७० कर्मचारी दिवसरात्र गस्तीसाठी तैनात करण्यात आली आहेत. वाघासंदर्भात कोणतीही खात्रीशीर माहिती मिळाल्यास वनविभागाच्या हेल्पलाईन क्र १९२६ या क्रमांकावर माहिती द्यावी. रात्रीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे व मॉर्निंग वॉक करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन खामगाव प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी के.सी. पडोळ यांनी केले आहे.