संग्रामपुरात राजकीय धक्के, राजकीय चमत्कार अन राजयोगाची परंपरा कायम! उषाताईंच्या नशिबी राजयोगच! पहिल्यांदाच निवडणूक लढविली, आता होणार अध्यक्ष
राज्यात आघाडीचे सरकार असताना येथील नगरपंचायतीची स्थापना झाली. पहिल्या लढतीतही कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने तीन टोकाची विचारधारा असलेल्या पक्षांनी खिचडी सरकार बनवत अध्यक्षपद वाटून घेतले. राजकारणाची अजब गजब परंपरा दुसऱ्या टर्मसाठी नुकतेच झालेल्या निवडणुकीत देखील कायम राहिली. माजी मंत्री आणि प्रबळ नेते अशी ओळख असलेल्या संजय कुटे यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला.
सत्ताधारी वंचित आघाडीला एकही जागा मिळविता आली नाही. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून अवघ्या 5 जागा मिळवत्या आल्या. प्रथमच मैदानात उतरलेल्या प्रहार व संग्रामपूर मित्र परिवार युतीने धक्कादायक निकालाची परंपरा कायम राखत 17 पैकी तब्बल 12 जागा पटकावल्या. या विजयाचे शिल्पकार शंकरलाल पुरोहित यांना पहिल्याच प्रयत्नात बहुमतासह मानाचे अध्यक्षपद मिळणार अशी चिन्हे होती. त्यात अवघडही काहीच नव्हते.
मात्र 27 जानेवारीला निघालेल्या सोडतमध्ये अध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती असे निघाले. यामुळे निकालानंतरही धक्क्याची परंपरा कायम राहिली आणि राजयोगाची देखील! प्रभाग 2 व 4 हे अनुसूचित जातीसाठी राखीव होते. मात्र 2 मधून विजयी झालेल्या उषाताई खिलाडी नंबर 1 ठरल्या. मात्र 4 मध्ये प्रहारला पराभव स्वीकारावा लागला. तिथे राष्ट्रवादीचे भारत बावस्कर विजयी झाल्याने ताईंचा क्लीन राजयोग साकारला. यामुळे पहिल्यांदाच निवडणूक लढवून सदस्य झालेल्या उषा सिद्धार्थ सोनोने यांना राजयोगामुळे प्रथम नागरिक होण्याची संधी मिळाली. युतीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कदाचित पुरोहित उपाध्यक्षपद स्वीकारतील ही शक्यतादेखील सूत्रांनी फेटाळून लावली. उपाध्यक्षपद ओबीसी संवर्गातील सदस्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. या पदावर कुणाची वर्णी लागते हे अनिश्चित असल्याने उपाध्यक्ष पदाच्या निवडीत देखील राजकीय धक्का ठरलेलाच हाय!