वादळाने तरुणाचा बळी घेतला! निंबाजी फांदी अंगावर पडली; एका महिन्याआधीच झाले होते लग्न! खामगाव तालुक्यातील माटरगाववर शोककळा! पातोंडा येथे तारा तुटल्या;
चिखलीच्या देऊळगाव घुबेत शेतकऱ्याचा गोठा उडाला..
Jun 4, 2023, 20:36 IST
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात आज, ४ जूनच्या दुपारी ठिकठिकाणी वादळाचा तडाखा बसला. खामगाव तालुक्यातील माटरगावात आज वादळाने एका तरुणाचा बळी घेतला.शेतातील निंबाच्या झाडाची फांदी अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. किशोर ज्ञानेश्वर खोडके (२४, रा. माटरगाव, ता - खामगाव) असे तरुणाचे नाव आहे.
किशोर खोडके शेतात काम करीत होते. वादळ सुरु असताना निंबाजी फांदी किशोरवर पडली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.एक महिन्याआधीच किशोरचे लग्न झाले होते, या दुर्दैवी घटनेने माटरगाववर शोककळा पसरली आहे.
सगळीकडे धुमाकूळ..
बुलडाणा शहरात आज दुपारी धुळीचे वादळ आले. खामगाव तालुक्यातील पातोंडा येथे विजेच्या तारा तुटल्या. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील आमचे प्रतिनिधी ऋषी भोपळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तेथील शेतकरी गजानन शेषराव घुबे यांचा गोठा या वादळामुळे उडाला. गोठ्याची टीनपत्रे उडाली त्यामुळे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. देऊळगाव घुबे चिखली रस्त्यावर झाडे पडल्याचेही वृत्त आहे.