उत्पादन खर्चही निघाला नाही! वैतागलेल्या शेतकऱ्याने पाच ट्रॉली कांदे रस्त्यावर फेकले; आंबेटाकळीच्या शेतकऱ्याची व्यथा..
Tue, 16 May 2023

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गारपीट व अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांदा उत्पादक शेतकरी तर यंदा अक्षरश: वैतागला आहे. शेकडो शेतकऱ्यांचा कांदा यंदा जमिनीत सडल्याने शेतकऱ्यांच्या भविष्याच्या वांधा झालाय. कांद्याच्या पैशातून लगीनसराई तसेच पेरणीचा व लेकरा बाळांच्या शिक्षणाचा खर्च करता येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र ती फोल ठरली. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील शेतकऱ्याने वैतागून ५ ट्रॉली कांदा हा रस्त्यावर फेकून दिलाय.
आंबेटाकळी येथील संजय कोल्हेंनी दीड एकरात ७५ हजार रुपये खर्चून कांदा लागवड केली होती. मात्र गारपीट आणि अवकाळी चा मोठा फटका पिकाला नसल्याने मोठ्या प्रमाणात कांदा सडला. कसा बसा ५ ट्रॉली कांदा त्यांनी काढला, मात्र आधीच गारपीटीने मार खाल्ल्याने कांदा टिकण्याची शक्यता कमी होती, त्यातच सध्याचा बाजारभाव भगता उत्पादन खर्च जाऊद्या.. मार्केटला नेऊनही त्याचे भाडे वसूल व्हायचे वांधे..त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने कांदा रस्त्यावर फेकून दिला..
पोकळ आश्वासन...
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे होऊन महिना उलटला, मात्र पोकळ मदतीच्या आश्वासनशिवाय भरीव असं काहीच मिळालं नाही. सरकार कुंभकर्णी झोपेत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी संजय कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.