खाकीतील माणुसकीने त्यांच्या चेहऱ्यावर आणला दिवाळीचा आनंद!

खामगाव ग्रामीण पोलिसांचे असेही दातृत्व!!
 
 
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरातील कर्तापुरुषच अचानक निसर्गाने हिरावून घेतला. त्‍यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गरिबीमुळे कुटुंबातील वाताहत झाली. त्‍यांची दिवाळीही अंधकारमयच ठरली असती. पण खाकीतील माणुसकीने त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद आणला. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची संकल्पना प्रत्यक्षात साकारत खामगाव ग्रामीण पोलिसांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला दोन कुटंुबांचे घर गाठत दिवाळी-भाऊबीज भेट दिली. साडी-चोळी, किराणा सामान, मुलांसाठी दिवाळी फराळ साहित्य, घर खर्चासाठी काही रोख रक्कमही पोलिसांनी देऊ केली.

खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. ते स्वतः पोहेकाँ कैलास चव्हाण, प्रकाश माटे, सोपान डाबेराव, श्याम देवकर यांच्‍यासह या कुटुंबांच्या घरी गेले. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास ५० गावे अाहेत. यापैकी गारडगाव (ता. खामगाव) येथील पोलीस पाटील विनय भीमराव इंगळे यांचे गेल्या फेब्रुवारीत कोरोनामुळे निधन झाले होते. तसेच कदमापूर येथील बकऱ्या चराई करणारे निरंजन धोंडीराम सरकटे यांचा गेल्या महिन्यात वीज कोसळून मृत्यू झाला.

घरातील कर्ते पुरुष अचानक सोडून गेल्याने या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जिल्ह्यात निराधार कुटुंबांना दिवाळी सणात काही प्रमाणात मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणेदार श्री. नाईकनवरे यांनी गारडगाव येथील इंगळे व कदमापूर येथील सरकटे या कुटुंबांची दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलीस कर्मचाऱ्यांसह भेट देऊन मदत करत दिलासा दिला. या भेटीतून पोलिसांनी दोन्ही कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न केला.