घरमालक नातेवाईकांकडे; 'अन' चोरटे घरात!खामगावात मध्यरात्री चोरट्यांचा हौदास!एकाच रात्री तीन घरे फोडली!चोरी करणारे सीसीटीव्हीत कैद!

 

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):घरमालक नातेवाईकांकडे गेल्याची संधी साधून खामगावात मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः हौदास घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
खामगाव शहरातील आदर्शनगरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन घरे फोडली आहेत. 

संजू रामराव पाटील (वय ५२ वर्ष) रा. आदर्शनगर (खामगाव) हे  ६ आक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराला कुलूप लावून कुटुंबासह जवळच असलेल्या नातेवाईकांकडे गेले होते. सकाळी ७ वाजताच्या दरम्यान परत आल्यानंतर बघतात तर त्यांच्या घराचे कुलूप व कडी - कोंडा तुटलेला होता. घरात गेल्यानंतर त्याच्या लक्षात आले अज्ञात चोरट्यांनी रात्री घरात चोरी केली आहे.पाटील यांच्या घरातू अंदाजे सात हजार रुपये रोख,१९ हजार  रुपयांचे सोन्या - चांदीचे दागिने असा एकूण २६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.यासह विश्वासराव संपतराव बोराडे (वय ७४ वर्ष रा.आदर्शनगर, खामगाव) यांच्याही घरातील ५ हजार रुपये लंपास केले आहेत.संदीप राऊत (रा. रा.आदर्शनगर, खामगाव) यांचेही घर फोडले आहे. राऊत हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घरातील नेमका किती मुद्देमाल लंपास केला ही माहिती मिळू शकली नाही. 


ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये अज्ञात चार चोरटे तोंडाला, डोक्याला रुमाल बांधलेला दिसून आले आहेत. त्यांच्या हातात घरपोडीचे साहित्य होते. ७ आक्टोबर रोजी संजू रामराव पाटील यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद शेळके हे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच एएसपी अशोक थोरात, ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.