गारपिटीनं सारी मका उद्‌ध्वस्त केली, आता मी कसं जगू?

मोताळा तालुक्‍यातील हताश शेतकरी गोविंद घोरपडेंचा बुलडाणा लाइव्हला फोन, कालपासून आलेत शेकडो शेतकऱ्यांचे फोन!!
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खरीपात अतिवृष्टीनं पिकाचं नुकसान केलं. रब्बीत आशेनं मका पेरली. कणसं फुटण्याच्या मार्गावर होती, पण कालच्या गारपिटीनं होत्याचं नव्हतं केलं... सारख्या नुकसानीनं हताश झालो असून, कुटुंब चालवायचं कसं... मला काहीच कळेनासं झालंय... आता मी कसा जगू अन्‌ माझं कुटुंब कसं जगवू... असा आक्रोश मोताळा तालुक्‍यातील पिंपळगाव नाथ येथील शेतकरी गोविंद गजानन घोरपडे यांनी बुलडाणा लाइव्हला फोन लावून केला. शासनाने माझ्यासारख्या शेतकऱ्यांना सध्या तातडीने मदत करण्याची आवश्यकता त्‍यांनी बोलून दाखवली.

काल, २८ डिसेंबरला दुपारी बुलडाणा, चिखली, मोताळा, खामगाव, संग्रामपूर, देऊळगाव राजा, मेहकर तालुक्‍यात मोठा अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाली. मका, तूर, कांदा, हरबरा, सोयाबीनसह फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी कालच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवाल यांची भेट घेतल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

कालपासून बुलडाणा लाइव्हला शेकडो शेतकऱ्यांचे फोन आले. त्‍यांनी शेतात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. शासनाकडून तातडीने पंचनाम्यांची अपेक्षा व्यक्‍त केली. हवालदील झालेल्या गोविंद घोरपडेंना तर अक्षरशः रडू कोसळले. त्‍यांच्याकडे सव्वा दोन एकर शेती असून, खरीप हंगामातही अतिवृष्टीमुळे त्‍यांची कपाशी हातातून गेली होती. त्‍यामुळे रब्बी हंगामात तरी हातात काहीतरी येईल, अशी आशा त्‍यांना होती. त्‍यांनी पेरलेली मकाही कालच्या गारपिटीने वाया गेल्यात जमा आहे.

कालच्या गारपिटीमुळे त्‍यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्‍यांनी भारतीय स्‍टेट बँकेतून ७० हजार रुपयांचे पीक कर्ज काढले होते. आता हे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न त्‍यांच्यासमोर आहेच, पण कुटुंबाच्या उदरनिर्वाह कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे. पत्नी, दोन मुले त्‍यांच्‍या कुटुंबात आहेत. त्‍यांच्यासारखेच असे नुकसान आजूबाजूच्या शेतकऱ्यांचेही झाल्याचे ते म्‍हणाले. कांदा रोपे, हरबरा, गहू, मका आदी पिकांचे नुकसान झाल्याचे त्‍यांनी सांगितले. शासनाने तातडीने पुढाकार घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी आणि आमची कुटुंबं जगवावीत, अशी मागणी त्यांनी केली.