हातातोंडाशी आलेला घास गेला!जिल्ह्याला अवकाळीने झोडपले! २३७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान; मलकापूर, खामगाव तालुक्याला सर्वाधिक फटका ! चिखली तालुक्यातील ५ गावांचा समावेश

 
nature
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या दोन - तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. काल, १८ मार्चला दिवसा व रात्री तर पावसाने अक्षरशः हैदोस घातल्याचे चित्र होते. जिल्ह्यातल्या ९६ गावातील  २३७१ हेक्टर वरील गहू, हरभरा ,कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा  प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. मलकापूर तालुक्यातील ३१ गावातील १३५८ हेक्टर क्षेत्र अवकाळी पाऊस व गारपीटीने बाधित झाले. त्यापाठोपाठ खामगाव तालुक्यातील २५ गावातील  ४६९ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले. मेहकर तालुक्यातील ३ गावांत  दमदार गारपीट झाली त्यात २२२ हेक्टर तर जळगाव जामोद तालुक्यातील ११ आणि संग्रामपूर तालुक्यातील २१ गावांत अनुक्रमे १४६ आणि १३५ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. चिखली तालुक्यातील ५ गावांतील ४१ हेक्टर वरील गहू , हरबरा, आंबा, कांदा या पिकांचे नुकसान झाल्याचेही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या अंदाजात म्हटले आहे.
    
खामगाव तालुक्यात या गावांत मोठे नुकसान..!


आमचे प्रतिनिधी भागवत राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील चिंचपूर,लाखनवाडा, पिंप्री (कोरडे) काळेगाव, कोंटी या गावांना गारपिटीचा फटका बसला . गारपिटीमुळे शेतातील पीक जमीनदोस्त झाली आहेत. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोरी- अडगाव, शहापूर आंबेटाकळी, बोथाकाजी, पळशी या परिसरात १८ मार्च रोजी मध्यरात्रीला अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गहू ,कांदा ,हरभरा, मका, संत्री,  यास इतर पिकांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचा पेरा करण्यात आला होता. गहू, हरभरा हे पिके काढणीला आले मात्र निसर्ग हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेते की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मागील वर्षी पावसाळा पुरेसा झाल्याने धरण, विहिरी,यांना पुरेसे पाणी उपलब्ध आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी व रब्बी पिकांची पेरणी केली होती. मात्र अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहे.त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावून गेला आहे.