आदिवासींना न्याय देण्यास सरकार कटिबद्ध- मंत्री ॲड. ठाकूर
शेगावच्या महाअधिवेशनात समाजाला केले आश्वस्त!
Nov 9, 2021, 09:38 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून कोळी महादेव आदिवासी समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. या समाजाच्या पाठिशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे आहे, अशी ग्वाही महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
शेगाव येथील कृष्णा कॉटेज हॉटेलमध्ये आदिवासी कोळी महासंघ, आदिवासी संघर्ष समिती व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन ७ नोव्हेंबरला पार पडले. त्यावेळी मंत्री ॲड. ठाकूर बोलत होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी आदिवासी कोळी महासंघाचे राष्ट्रीय नेते व माजी मंत्री दशरथ भांडे होते. भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, माजी खासदार उल्हास पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. माजी मंत्री दशरथ भांडे यांनी यावेळी समाजाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी दिला. अधिवेशनासाठी दशरथ लोणकर, जगन्नाथ घुले, वसंतराव तायडे, रवी भांडे, वंदनाताई जामनेकर आदींनी पुढाकार घेतला.