जळक्यांचा कारनामा; खामगावात पेट्रोल टाकून कृषी केंद्राला लावली आग ! बियाणांच्या बॅगांसह इतर साहित्य जळून खाक! घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद..
Jun 19, 2024, 14:18 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून कृषी केंद्राला आग लावल्याची खळबळजनक घटना १७ जूनच्या रात्री खामगावात उघडकीस आली. प्रकरणी, तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, संजय उर्फ मुन्ना पूरवार यांचे सरकी लाईन भागात ओम साई ऍग्रो नावाने कृषी केंद्र आहे. नेहमीप्रमाणे १७ जूनच्या रात्री दुकानाला कुलूप लावून त्यांनी दुकान बंद केले होते. दरम्यान, रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरिकाला दुकान पेटलेले दिसले. त्यावेळी त्यांनी लगेचच दुकान मालक अभिषेक पुरवार यांना फोन केला. पूरवार यांनी लगेचच घटनास्थळ गाठून आग विझवण्याचे कार्य सुरू केले. लागलेल्या आगीत सोयाबीन बॅगांसह इतर साहित्य जळाले. यात दुकान मालकांचे नुकसान झाले आहे. प्रकरणी अभिषेक पूरवार यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या आरोपीने तोंडाला रुमाल बांधून हे कृत्य केले. त्यामुळे, आरोपी निष्पन्न करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनास्थळापासून इतर काही भागांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि खात्री करून लवकरात लवकर आरोपी निष्पन्न होणार असल्याची माहिती ठाणेदार प्रवीण नाचणकर यांनी बुलडाणा लाइव्हला दिली. सध्या तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.