आज होणार भेंडवळची घटमांडणी, उद्या भविष्यवाणी! ३०० वर्षांची जुनी परंपरा!
जळगाव जामोद( ज्ञानेश्वर ताकोते पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या सुप्रसिद्ध भेंडवडची घटमांडणी आज, २२ एप्रिल रोजी संध्याकाळी होणार आहे. तर, २३ एप्रिल रोजी सकाळी या घटमांडणीची भाकिते जाहीर केली जाणार आहेत.
पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या या गावी घट मांडण्याची परंपरा सुमारे तीनशे वर्षांपासून सुरू आहे. घट मांडण्याची परंपरा सुरू करणारे चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज हे भविष्यवाणी जाहीर करतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी घटामध्ये झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविले जाते. त्यावरून पिकाचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त तर कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितला आहे, यावरून शेतकरी यंदा कोणती पिके घ्यायची हे ठरवत असतात. याशिवाय देश आणि राज्याच्या राजकारणाविषयीचे भाकीत देखील वर्तविले जाते. चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली परंपरा पुंजाजी महाराज यांनी आजही कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांचा या भाकितांवर दृढविश्वास आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर पूर्वमांडणी केली जाते. या दोन्ही मांडणीमध्ये साम्य असते. त्यामुळे या दोन्ही मांडणींचे निष्कर्ष एकत्र जोडून ही भाकिते वर्तवली जातात. यामधून पाऊसपाण्यासोबतच देशाचे आर्थिक आणि राजकीय भाकीतदेखील सांगितले जाते. त्यामुळे भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.