भेसळीचा संशय... खामगावात पावणेसहा लाखाचे खाद्यतेल जप्त!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भेसळीच्‍या संशयावरून अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने खामगाव एमआयडीसीत पावणेसहा लाख रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्‍त केला आहे. ५ नमुने तपासणीसाठी विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे. ही कारवाई काल, २७ ऑक्‍टोबरला करण्यात आली.

जिल्ह्यात अन्‍न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार अन्‍न आस्थापना तपासणी व अन्‍न नमुने घेण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेतं रियुज्ड टिनचा वापर तसेच भेसळीच्या संशयावरून खामगाव एमआयडीसीमधील मे. फॅमिली ऑईल पॅकिंग या आस्थापनेकडून रिफाईन सोयाबीन ऑईल (पी.एच.गोल्ड), आर. बी.डी. पॉमोलीन ऑईल, रिफाईन सोयाबीन ऑयल (संस्कार), रिफाईन इडीबल ऑईल (लोटस) या सर्व खाद्यतेलाचे एकूण ५ अन्‍ननमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत.

उर्वरित ५,७९,०५७ रुपये किमतीचा एकूण ३८३३.०६ किलोग्रॅम साठा रियुज्ड टिनचा पॅकिंगसाठी वापर केल्यावरून व त्यांचा दर्जाबाबत संशय आल्यावरून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके, श्री. वसावे, दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. घोसलवाड, श्री. महाल्ले, श्री. महागडे, श्री. विशे, श्री. दहातोंडे यांचे पथकाने केली, असे सहायक आयुक्त स.द केदारे यांनी कळविले आहे.