धुमाकूळ घालणारे दोन भामटे चोरटे सोनाळा पोलिसांनी केले जेरबंद!मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता...

 
संग्रामपूर(स्वप्निल देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात दिवसेंदिवस चोरट्यांचा हैदोस वाढतो आहे. शहरातच नव्हे तर गावखेड्यात शेतशिवारात शेती साहित्याच्या देखील चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांसमोर या भामट्या भुरट्या चोरट्यांचे आवाहन उभे ठाकले असतांनाच सोनाळा पोलिसांनी २ भामट्यांना त्यांनी चोरलेल्या मुद्देमालासह अटक केली आहे. शेख इरफान शेख युसुफ(२९, रा. झोपडपट्टी सोनाळा) आणि शेख युसुफ शेख अहमद (रा. इमलीपुरा, सोनाळा) अशी चोरट्यांची नावे आहेत.
सोनाळा येथील दत्तात्रय टाकसाळ यांच्या राहत्या घरातून २५ जून रोजी २१ हजार २०० रुपयांच्या साहित्याची चोरी झाली होती. तशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती.या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल व चोरलेले २१ हजार रुपयांचे साहित्य ज्यात विवो कंपनीचा मोबाईल,वेल्डिंग मशीन, अल्युमिनियम कटर असा ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून यादरम्यान आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.