...म्‍हणून ॲड. हरीश रावळ चढले विजेच्या खांबावर!; मलकापूर तालुक्‍यातील घटना

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील पाणीपुरवठ्याची वीज महावितरण कंपनीने आठ दिवसांपूर्वी तोडली होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होती. ६० हजार रुपये भरल्याशिवाय वीज जोडणार नाही, असा दम महावितरणने भरला होता. ग्रामपंचायतीने १५ हजार रुपये भरण्याची तयारी दर्शविली; मात्र महावितरण ऐकायला तयार नव्हते. अखेर मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेते ॲड. हरीश रावळ यांनी काल, १८ मार्च रोजी दुपारी हरणखेड गाठून स्वतः खांबावर चढून वीज जोडून दिली.
गेल्या आठ दिवसांपासून महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. जनावरांना पाणी पाजण्यासाठी दूरवर जावे लागत होते. सरपंचांनी ही माहिती ॲड. रावळ यांना दिल्यानंतर रावळ यांनी  हरणखेड गाठले. स्वतः खांबावर चढून त्यांनी पाणीपुरवठा योजनेचे वीजपुरवठा जोडून दिला. यानंतर जर पुन्हा लाईनमन कनेक्शन तोडण्यासाठी खांबावर चढला तर त्याला उतरू देणार नाही, असा इशारा ॲड. रावळ यांनी दिला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी सरपंच नागो राणे, ग्रामपंचायत सदस्य राजू नेवे, पंजाजी तायडे, विनोद तायडे, चेतन खाचने, अनंता करांडे, दिनकर म्हस्के, चंद्रकांत बहुरूपे, संजय सोनटक्के, बळीराम म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.