साहेब...आमच्या घरात येणारा रस्ता वाहून गेला;आवार येथील विनोद घनमोडेंचा "बुलडाणा लाइव्ह" कडे टाहो....
Jul 13, 2024, 09:31 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):साहेब आमच्या घरात येणारा मुख्य रस्ता पावसामुळे वाहून गेला. घरातील वृद्ध आईवडील, लहान पोरं-बाळं यांनी घरात ये-जा कशी करायची असा प्रश्न उपस्थित करत खामगाव तालुक्यातील आवार गावच्या विनोद घनमोडे' यांनी बुलडाणा लाइव्ह'कडे टाहो फोडला आहे.
खामगाव तालुक्यातील विनोद घनमोडे (३६) रा.आवार यांचे घर गावातील एका कोपऱ्यात आहे. मागील दोन दिवसांआधी खामगाव तालुक्यातील आवार, नागापूर, पिंप्रीगवळी या गावात मागील काही वर्षात झाला नसेल एवढा पाऊस झाला होता. या पावसाने अनेकांची शेती वाहून गेली होती. आमदार आकाश फुंडकर यांनी स्वतः नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले त्यानुसार पंचनामे चालू आहेत. मात्र विनोद घनमोडे यांच्या घरासह त्यांच्या घरात जाणारा कच्चा मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्या रस्त्याला दोन - दोन, तीन - तीन फुटांचे गड्डे पडले आहेत. एखाद्या तरुण व्यक्तीलाही भर दिवसा त्या रस्त्याने घरात जायचे म्हटलं तर कठीण आहे.
मग घनमोडे यांच्या घरात असलेले वृद्ध आईवडील, लहान पोरं-बाळं कसे जाणार? असा प्रश्न घनमोडे यांना पडला आहे. रात्रीच्या वेळी घराच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रॉक पोलवर मागील सहा महिण्यापासून साधा लाईट' ही नाही वारंवार ग्रामपंचायत ला सांगून लावू - लावू असे उत्तरे मिळत असल्याने शेवटी आपला टाहो घनमोडे यांनी बुलडाणा लाइव्ह'कडे फोडला. आतातरी संबंधित प्रशासनाला जाग येईल का? की फक्त गरीब आहे, म्हणून संबंधित प्रशासन घनमोडे यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करेल..असा प्रश्न उपस्थित होत आहे.