धक्कादायक! सूर्यदेवाने कहर केला..! उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू; संग्रामपूर तालुक्यातील घटना

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नवताप मुळे तापमान नवीन विक्रम करीत असतानाच उष्माघाताने एका शेतमजुराचा मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी येथे आज मंगळवारी ही दुर्देवी अन खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी तामगाव ( तालुका संग्रामपूर) पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची आणि मृतक उष्माघाताने दगावल्याची नोंद आहे.
 या घटनेमुळे आरोग्य यंत्रणासह प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे. सचिन वामनराव पेठारे असे उष्माघाताने मृत्यू पावलेल्या ४० वर्षीय मजुराच नाव आहे. तो संग्रामपूर परिसरात मजुरीचे काम करीत होता. तो बुलढाणा जिल्ह्याच्या ( तामगाव पोलीस ठाणे हद्दीत दगावला असला तरी मूळचा तेल्हारा (जिल्हा अकोला) येथील जिजामाता नगर मधील रहिवासी आहे. संग्रामपूर परिसरातील रिंगणवाडी परिसरात आज त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 
मृतकाचा नातेवाईक (चुलत भाऊ?) अजय संपत पेठारे (३१ वर्षे, राहणार जिजामाता नगर ,तेल्हारा, जिल्हा अकोला)
 याने त्याची ओळख पटविली. त्यानेच तामगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार सचिन वामनराव पेठारे हा आज मंगळवारी पायीच गावाकडे जात होता.मात्र उष्माघाताने तो दगावला, असे तक्रारीत नमूद आहे. पोलीस हवालदार गजानन गव्हांदे यांनी फिर्याद दाखल करून घेतली असून तामगाव ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हवालदार प्रमोद मुळे करीत आहे. प्रकरणी आकस्मिक मृत्यू १७४ जा. फो. अंतर्गत घटनेची नोंद करण्यात आली आहे.