धक्कादायक! शेंगदाणे म्हणून खाल्ल्या चंद्रज्योतीच्या बिया; ९ बालकांना विषबाधा! मलकापूर तालुक्यातील घटना
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एका ६५ वर्षीय महिलेने शेंगदाणे सांगून विषारी वनस्पती असलेल्या चंद्रज्योती नामक फळाच्या बिया बालकांना खाण्यास दिल्याने ९ ते १० वर्षे वयोगटातील तब्बल ९ बालकांना विषबाधा झाल्याची घटना मलकापूर तालुक्यातील मौजे कुंड खुर्द येथे १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून या बालकांवर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मलकापूर तालुक्यातील कुंड खुर्द येथील सोहम निना तायडे, दिव्या संतोष कांडेलकर, भाग्यश्री श्रीकृष्ण कांडेलकर, रिया सुरेश बावस्कर, नम्रता सुरेश बावस्कर, वैष्णवी रमेश बावस्कर, श्रेयश अशोक कांडेलकर, श्रेया रमेश बावस्कर ही बालके खेळत खेळत शिवाराकडे गेली. दरम्यान, गावातील एका ६५ वर्षे महिलेने शेतातील विषारी वनस्पती असलेल्या चंद्रज्योती नामक फळाच्या बिया या बालकांना शेंगदाणे म्हणून खाण्यास दिल्या. या बिया खाल्ल्यानंतर मुले घराकडे परतली. दरम्यान, घरी येतात या बालकांना उलट्या सुरू झाल्या. मुलांना अस्वस्थ वाटून त्रास होऊ लागल्याने त्यांना तुम्ही कुठे गेला होता ? काय खाल्ले? असे प्रश्न पालकांनी विचारले असता सर्वच मुलांनी त्या महिलेने शेंगदाणे म्हणून आम्हाला कोणत्या तरी बिया खाण्यास दिल्या, असे सांगितले. दरम्यान, त्या सर्व मुलांना गावातील एका वाहनाद्वारे उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.