धक्कादायक!खामगावच्या घाटपुरीत सपासप सपासप 'तलवार' चालली!

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहराला लागून असलेल्या घाटपुरी येथे शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात झालेल्या भांडणात तलवार चालल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
घाटपुरी येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी अभिषेक सदाशिव घोपे (२९ वर्ष) हे ११ जुलै रोजी घरी होते. रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान शेजारी राहणारे अंबादास साळोकार (४५), गजानन साळोकार (४०),सौ उषा अंबादास साळोकार (३४), प्रेम अंबादास साळोकार ( सर्व रा. पुंडलिक नगर, घाटपुरी खामगाव) या चौघांनी अभिषेक घोपे यांना अश्लील शिवीगाळ करत आवाज दिला. त्यामुळे अभिषेक घोपे हे आपल्या घराबाहेर आले. यावेळी अंबादास साळोकार याच्या हातात तलवार तर उषा साळोकार, प्रेम अंबादास साळोकार यांच्या हातात लाकडी दांडके होते. गजानन साळोकार (४०) हा अभिषेक घोपेच्या घरात घुसला व त्याने अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी अभिषेक घोपे यांचे हात पकडले व अंबादास साळोकार याने त्याच्यावर तलवारीने सपासाप वार केले.
घोपे यांनी आपल्या डाव्या हाताच्या मदतीने तो वार अडवला. मात्र, त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या पंजाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे, तो हात फॅक्चर झाला आहे . यावेळी वरील चौघांनी त्याच्या पायावर, डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण देखील केली. अभिषेक घोपे याची पत्नी व साळा हे भांडण आवरण्यास गेले तर त्यांना देखील लाथा - बुक्क्यांनी मारहाण झाली. एवढेच नाही तर घोपे यांच्या लहान मुलांना सुद्धा मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अभिषेक सदाशिव घोपे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. तक्रारी वरून, पोलिसांनी चौघां विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.