धक्कादायक! खामगावात दिवसाढवळ्या शेतकऱ्याला लुटले; बँकेतून पीक कर्जाचे काढलेले ४ लाख ७० हजार लुटारूंनी लांबवले..

 
Vjf
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिवसाढवळ्या लुटारूंनी धुमाकूळ घालत शेतकऱ्याने बँक मधून पीक कर्ज काढलेली रोख रक्कम पळवल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरात घडली आहे.

झाले असे की, दिलीप सदाशिव हटकर ( वय वर्ष - ५५ रा - हिवरखेड ता - खामगाव) हे आज,  २४ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान खामगाव नांदुरा रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया  येथे पीक कर्ज काढण्यासाठी त्यांच्या दोन मुलांसोबत आले होते. हटकर यांनी बँकेतून ४ लाख ७० हजार रुपये पीक कर्ज काढले, ती रक्कम आपल्या सोबत आणलेल्या बॅगेत ठेवली होती. आपल्या रोडच्या बाजूला उभ्या केलेल्या मोटारसायकल जवळ आल्यानंतर हटकर यांच्या हातातील बॅग एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी हिसकावून पळवली आहे.

हटकर यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या मुलांनी त्या दुचाकीस्वारांना पकडण्याचा प्रयन्त केला मात्र ते सुसाट पळून जाण्यात यशस्वी झाले.खामगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपासणी चालू केली आहे. दिलीप हटकर यांनी तशी तक्रार खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.