बिनलाज्या मामा! नात्याला फासला काळीमा; १० वर्षीय भाचिवर केला बलात्कार; खामगावची घटना
Apr 12, 2023, 07:39 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वासनेच्या भुकेपायी एका नराधमाला नात्याचे देखील भान राहिले नाही. स्वतःच्या सख्ख्या भाचिवर या विकृत नराधमाने बलात्कार करून मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासला. ही संताप आणणारी घटना ८ एप्रिलच्या रात्री खामगावात घडली असून पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपीचे वय ४० वर्षे आहे. तो पुण्यात एका कंपनीत काम करतो. ८ एप्रिलला तो खामगावात त्याच्या बहिणीकडे आला होता. त्यावेळी त्याची वाईट नजर त्याच्या भाचीवर पडली. रात्रीच्या दरम्यान त्याने भाची सोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने भाचीवर बलात्कार केला. या घटनेनंतर मामा तिथून पळून गेला. तत्पूर्वी घडला प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी त्याने भाचीला दिली.
दरम्यान पीडित मुलीने वेदना होत असल्याने ही बाब तिच्या आईला सांगितली. मुलीच्या आईने शहर पोलिस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीचा कसून शोध घेतला. अखेर पोलिसांनी अकोला बायपास येथून नराधम मामाला अटक केली आहे.