संग्रामपूर दुहेरी हत्याकांड प्रकरण!शेती, कर्ज अन् क्रुरतेचा कळस ! सासऱ्याने गर्भवती सुनेला अन् नातवाला का संपवले? धक्कादायक कारण समोर...वाचा...

 
Bxbx
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):अल्पभूधारक शेती आणि शेतमजुरीच्या भरवशावर एकत्र नांदणार कुटुंब एका क्षणामध्ये उध्वस्त झाल्याचा प्रकार संग्रामपुरात मंगळवारी २३ जानेवारीला घडला. दुधावरची साय असलेल्या नातवालाच आजोबांनी संपवलं आणि सोबतच जगात येऊ पाहणाऱ्या आपल्याच मुलाच्या वारसाला त्याच्या आईसह ठार केले. समजामनावर खोलवर जखम करणारी ही घटना आणि यामागचं कारण हे शेतीवर काढलेलं कर्ज असल्याचं समोर येत आहे.
घाटाखाली संग्रामपूर मध्ये ६५ वर्षीय सासऱ्यांने आठ वर्षीय नातवासह गर्भवती असलेल्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची बातमी मंगळवारी दुपारनंतर वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली. सोशल माध्यमावर या बातमीने हळहळ देखील व्यक्त झाली. पत्नी, दोन मुलं, दोन सुना , एक नातू आणि नव्याने जगात येऊ पाहणारा एक जीव असं भरलेल घर असताना आजोबाने हा प्रकार का घडवला याची चर्चा काळजात चर्र करत आहे.
नारायण गायकी (६५) असे आरोपीचे नाव आहे. तसेच समर्थ देवानंद गायकी व अश्विनी गणेश गायकी अशी मृतांची नावे आहेत. नातू आणि सुनेचे हत्याकांड घडविण्यामागील नेमके कारण हे मुलाने काढलेले कर्ज आणि परत फेड न झाल्याने घरात सुरू झालेला वाद हेच असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
संग्रामपूर तालुका मुख्यालय जरी असला तरीही खेडे वजा गावच याला म्हणता येईल. त्यामुळे शेती आणि शेतमजुरी यावर अधिक भर या भागात आहे. गायकी यांच्या घरातला असलेला वाद मंगळवारी दुपारी रक्तरंजित घटना घडवून गेला. नारायण गायकी यांचा मोठा मुलगा देवानंदने चार एकर शेतीवर सुमारे ७५ हजाराचे कर्ज घेतलं होतं. ते फेडता गेले नाही. एकतर कर्ज भरा किंवा मी शेती विकतो असे वडील नारायण मुलांना म्हणायचे.यातून मुलं आणि सुना आपल्या विरोधात आहेत आणि हीच भावना बळवल्याने नारायण यांचा कुटुंबावर राग वाढत गेला. त्यातूनच २३ जानेवारीला दुपारी त्यांनी रागाच्या भरातच टोकाचे पाऊल उचलले. 
समर्थ हा स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता तर त्याचे वडील देवानंद हे शेतमजूर म्हणून काम करतात आणि मृतक अश्विनीचा नवरा अर्थात नारायण चा दुसरा मुलगा गणेश हा एका दुकानांमध्ये कामगार म्हणून काम करून उदरनिर्वाह चालवतो. 
आपल्या हातून घडलेला गुन्हा हा किती मोठा आहे याची जाणीव नारायणला घटनेवेळी झाली नसेलही. पण त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन त्याने स्वतः हजर होत काय केले पोलिसांना सांगितले. २६ जानेवारी पर्यंत तीन दिवस न्यायालयाने नारायण गायकी याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासामध्ये आणखी बाबी समोर येणारच आहेत. पण कर्जाचे प्रकरण आणि वाद हेच या घटनेमागचं खरं कारण असल्याचं तपास सूत्रांनी सांगितले. देवानंद चा एकुलता एक मुलगा यात गेला तर गणेशने जीवनभराचा साथीदार गमावला. ज्यांनी आशीर्वादासाठी हात डोक्यावर ठेवावा, त्याच बापाच्या हातांनी हे कृत्य घडल.नारायण याच्या या कृत्यामुळे नातेसंबंधाला मोठा धक्का बसला आहे.