दोन्ही ठिकाणी 15 चा आकडा रिपीट! जादूई आकडा गाठणार कोण? पुरवणी लढत ठरलीय निर्णायक!! नगर पंचायतीसाठी नेत्यांनी लावली ताकद

 
election
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील संग्रामपूर व मोताळा या दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीतील राजकीय लढती वेगळ्या ढंगाच्या असल्या तरी दोन्ही ठिकाणच्या  आकडेवारीत मजेदार साम्य वा योगायोग असून, 15 चा आकडा लक्षवेधी ठरलाय. आता हा जादुई आकडा कोणता पक्ष वा आघाडी गाठणार असा प्रश्न निवडणुकीच्या पुरवणी लढतीनिमित्त ऐरणीवर आलाय!

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रत्येकी 17 सदस्यीय असलेल्या या संस्थांची लढत दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक पार पडली, तर दुसऱ्या टप्प्यात  प्रत्येकी 4 जागांसाठी लढत होत असून, 18 जानेवारीला मतदान होणार आहे. संग्रामपूरमध्ये महाविकास आघाडी, भाजप आणि प्रहार - संग्रामपूर मित्र आघाडी अशी तिहेरी लढत तर मोताळ्यात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या 13 जागांच्या  लढतीच्या एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याइतक्या जागा मिळणार नाही असे चित्र आहे.

मोताळ्यात सेना व काँग्रेस तर संग्रामपूरमध्ये आघाडी, भाजप व युती जवळपास समांतर असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. यामुळे बहुमत किमान कामचलाऊ बहुमताच्या दृष्टीने उरलेल्या  4 जागा सर्वांसाठी निर्णायक ठरल्यात. यामुळे या जागांसाठी आमदार संजय कुटे, संजय गायकवाड, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह भावी आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. यामुळे  प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवार देखील ताकदीने भिडले आहे.

या पुरवणी लढतीत दोन्ही ठिकाणी 15  या आकड्याचा मजेदार योगायोग जुळून आलाय! दोन्ही ठिकाणी 4 जागांसाठी प्रत्येकी 15 उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून 15 उमेदवारांनी माघार घेतली. दोन्ही ठिकाणच्या प्रमुख नेत्यांनी एकूण 15 जागांचा दावा खासगीत बोलून दाखवला. अभ्यासक हा दावा मान्य करायला तयार नसले तरी कुणाला किती जागा मिळतील हे सांगू शकत नाहीये. इतकी यंदाची लढत गुंतागुंतीची ठरलीय! यामुळे त्यासाठी 19 तारखेला होणाऱ्या मतमोजणीच वाट पाहणे भाग  पडणार आहे.