चिखल तुडवत रविकांत तुपकर गावागावात पोहचले! जिल्हा परिषद शाळेत पूरग्रस्तांसोबत केला मुक्काम; तुपकर संतप्त, म्हणाले लोकांचे जीव गेल्यावर मदत देता काय?

 
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीत प्रचंड मोठे नुकसान झाले. ७२ हजार हेक्टर पेक्षा अधिक जमून खरडून गेली, शासकीय आकडेवारीनुसार २०३ गुरे दगावल्याची नोंद आहे. दोन्ही तालुक्यांतील २२८६ नागरिक बेघर झाले आहेत. एवढे होऊनही प्रशासकीय यंत्रणा म्हणावी तेवढ्या गतीने सक्रिय नाही. दोन दिवस उलटून देखील कोणतीही शासकीय मदत पूरग्रस्तांना मिळाली नाही. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्यात येऊन गेले पंचतारांकित व्यवस्थेत शेगावात आढावा बैठक घेण्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष पुरग्रस्त भागात जायला त्यांना वेळ मिळाला नाही. दुसरीकडे या संकटात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मात्र पूरग्रस्त भागात तळ ठोकून आहेत. 
२३ जुलैला दिवसभर विविध गावांत, शेतात जाऊन पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी रविकांत तुपकरांनी जाणून घेतल्या. चिखल तुडवत तुपकर गावागावात पोहचत होते, पूरग्रस्तांना धीर देत होते. महापुराने झालेली नागरिकांची दयनीय अवस्था पाहून तुपकरांसह साऱ्यांचेच डोळे यावेळी पाणावलेले दिसले. २३ जुलैच्या रात्री रविकांत तूपकरांनी भोटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुक्काम केला. याच शाळेत पुराने बेघर झालेल्या नागरिकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
   कालखेड फाटा, अकोला फाटा, दुर्गादैत्य, काथरखेड, पिंप्री, एकलारा, बावनबीर, निवाना, चांगेफळ, अकोली, रुधाना, वकाना, पहूरपूर्णा, धामणगाव गोतमारे या गावांत रविकांत तुपकरांनी पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्या. "पुरामुळे झालेले नुकसान डोळ्यात पाणी आणणारे आहे, नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत. मात्र शासन कुंभकर्णी झोपेत आहेत. दोन दिवस उलटून देखील कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. राज्य शासनाचे मंत्री जिल्ह्यात येऊन आढावा बैठकीचे ढोंग करतात, मात्र पूरग्रस्त गावात यायला त्यांना वेळ नाही. पुर ओसरल्यावर रोगराईचा धोका आहे. आता लोकांचे जीव गेल्यावर त्यांना शासन मदत करणार आहे का ? असा उद्विग्न सवाल रविकांत तुपकर यांनी केला आहे.