उद्या मतदान ः मोताळ्यात आघाडीविरांची एकमेकांशी टक्कर! संग्रामपुरात आघाडीसमोर तिहेरी आव्हान!! बाजी मारणार कोण?
ओबीसी बांधवांसाठी सामाजिकवजा राजकीय धक्का ठरणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या दोन संस्थांमधील अर्धवट निवडणूक जोरदार रंगली आहे. याचे कारण पहिल्या टप्प्यात २६ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १९ जानेवारीला ८ जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र निवडणूक अर्धवट असली तरी चुरस व रंगत मात्र फुल्ल आहे.
मोताळ्यात आघाडीतील काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी हे कथित मित्रपक्ष शत्रू असल्याच्या अविर्भावात एकमेकांवर तुटून पडल्याचे प्रचारात दिसून आले. याशिवाय वंचित बहुजन आघाडी व भाजप मैदानात असले तरी ते मोजक्या जागा लढवत आहेत. राष्ट्रवादीची देखील अशीच कंडिशन आहे. यामुळे ५ पक्ष मैदानात असले तरी अंतिम टप्प्यात ही लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी चुरशीची दुरंगी लढत ठरली आहे. सेनेतर्फे झालेल्या अब्दुल सत्तार तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेने रंगत आणली. पहिल्या टप्प्यात किमान ७ जागी बाजी मारू, असा काँग्रेसचा तर याहीपेक्षा जास्त जागी बाजी मारण्याचा सेनेचा दावा आहे. यामुळे उद्या होणाऱ्या मतदानात उत्साही मतदानाची दाट शक्यता आहे.
"भुता'चे आव्हान!
संग्रामपूरमध्ये आघाडी व भाजपामध्येच लढत राहील हा पहिल्या टप्प्यातील अंदाज काहीसा चुकीचा ठरण्याची चिन्हे आहेत. अंतिम टप्प्यात "प्रहार'चे सर्वेसर्वा तथा मंत्री यशोमती ठाकूर यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांच्या जिल्ह्यातील भूत ना. बच्चू कडू यांनी लढत तिरंगी बनविली आहे. प्रहार व संग्रामपूर मित्र मंडळ या युतीने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जोरदार मुसंडी मारली. यामुळे लढतीच्या पूर्वार्धात ही युती चमत्कार घडविण्याच्या बेतात असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
ना. यशोमती ठाकूर यांनी आपल्या प्रचारसभेत ना. कडू यांचा आमच्या (अमरावती) जिल्ह्यातील भूत असा उल्लेख केला होता. त्याला ना. कडू यांनी संयमाने प्रति उत्तर दिले. मात्र यामुळे लढत पेटली! यामुळे प्रसंगी तेथील लढत दुरंगी सुध्दा ठरू शकते. महाविकास आघाडीचा हा पहिला प्रयोग असल्याने निकाल लक्षवेधी ठरलाय! मागील कालावधीत सत्ताधारी असलेली वंचित आघाडी कुणाचे नुकसान करते, यावर देखील १३ पैकी काही ठिकाणाचा फैसला होणार आहे. उर्वरित ४ जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होणार असून मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. पहिल्या डावात काही कारणाने माघारलेले वा कमी पडलेले पक्ष दुसऱ्या डावात ती कसर भरून काढण्याचे निकाराने प्रयत्न करणार आहे. यामुळे केवळ ४ जागांसाठी असणारी लढतसुद्धा तेवढ्याच चुरशीची ठरणार हे नक्की! लढतीतील चुरस, पंचरंगी घमासान या परिणामी उद्या होणारे मतदान 70 टक्केचा आकडा गाठेल असा रागरंग आहे.