जलंबच्या आरोग्य केंद्रातील ओपीडी दुपारीनंतर बंद, रुग्णांची गैरसोय

 
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलंब येथील आरोग्य केंद्रात काही दिवसांपासून दुपारी बारानंतर ओपीडी बंद असते. त्यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्‍यांना उपचाराविना परतावे लागते किंवा नाईलाजास्तव खासगी दवाखान्यांमध्ये उपचार करून घ्यावे लागतात.

शेत मजुराकडे काम धंदा नसल्यामुळे उपचार घेण्यासाठी पैसे नसतात. जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पंधरा ते वीस खेडे लागू आहेत. आरोग्य केंद्रातील कर्मचारी सौ. अग्रवाल व इतर कर्मचारी दुपारी बारानंतर दवाखान्यात हजर नसतात. संध्याकाळची ओपीडी बंद आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रुग्णांची सेवा सुरळीत करून देण्यात यावी, अशी मागणी जलंब येथील सरपंच सौ. मंगला उत्तम घोपे व सामाजिक कार्यकर्ते उत्तम घोपे व जलंब परिसरातील रुग्ण करीत आहेत.