अरेच्चा असं व्हय तर..खामगावच्या सुटाळपुऱ्यात गजानन महाराजांच्या वेशात प्रगटलेला तो' निघाला लातूरचा रामराव शेषराव बिराजदार!
संत गजानन महाराज समजून हजारो भाविकांनी घेतले होते दर्शन; लोक म्हणे, महाराज गायब झाले..! वाचा नेमका काय आहे प्रकार..
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावच्या सुटाळपूरा येथे श्री संत गजानन महाराज प्रगटले असे मेसेज फोटोसह सोशल मीडियावर काल १ आक्टोबर रोजी व्हायरल झाले होते. यानंतर "बुलडाणा लाइव्ह"ने याची सविस्तर माहिती घेतली, दीपक क्षीरसागर (रा. सुटाळपुरा,खामगाव) यांच्या घरी काल १ आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या सारखा दिसणारा एक व्यक्ती ऑटोने आला होता. तो घरातील तुळशीच्या बाजूला येवून बसला होता.त्याच्याजवळ असलेल्या पिशवी मधून गजानन महाराजांची प्रतिमा असलेला फोटो काढून घरातील दीपक क्षीरसागर यांना दिला होता. क्षीरसागर कुटुंबाशी गप्पा केल्यानंतर त्यांनी तुम्ही कोण आहात? कसे आला? हे विचारपूस केली. मात्र तुम्हाला माणसातील देव दिसत नाही का? असे बोलून तो महाराजांच्या वेशभूषेत आलेला व्यक्ती तिथून रागाने निघून गेला होता. सुटाळपुरा येथील राहणार देशमुख यांनी त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. माझा फोटो काढू नको, असे म्हणून त्या व्यक्तीने त्यांना फोटो काढण्यास नकार दिला होता. महाराजांच्या वेशभूषेत असलेला तो व्यक्ती त्यानंतर तिथून निघून गेला होता.
संध्याकाळी पुन्हा प्रकटला..
संध्याकाळच्या ७ वाजताच्या दरम्यान पुन्हा तो व्यक्ती सुटाळपुऱ्याच्या श्री गजानन महाराज यांच्या मंदिरावरील पायरीवर बसलेला दिसला. नंतर किशोर सातव (रा.सुटाळपुरा, खामगाव) यांच्या घरी त्यांना नेण्यात आले होते. परिसरातील जवळपास दीड हजार लोकांनी महाराजांच्या वेशभूषेत असलेल्या त्या व्यक्तीचे गजानन महाराज समजून दर्शनही घेतले होते.आरतीही केली.त्या बहरूपीला सुटाळपुरा येथील व्यक्तीने त्याच्या दुचाकीवर शेगाव येथील रेल्वे स्थानकावर सोडून दिले. तेथे गेल्यानंतर ज्या व्यक्तीने त्यांना सोडले त्यांना ते म्हणाले की मला सोडल्यानंतर मागे बघू नको,येथून निघून जा.. रेल्वे स्थानकावरून महाराजांच्या वेशभूषेतील व्यक्ती कुठे गेला? असा प्रश्न सर्वांना पडला होता..
असा लागला शोध..!
महाराजांच्या वेशभूषेत असलेल्या तो बहुरूपी लातूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या व्यक्तीचे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते आहे. हाच व्यक्ती दोन दिवसापूर्वी शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा बुद्रुक या गावात आढळला होता. या गावातील पोलीस पाटलांनी त्याची झडती घेतल्यानंतर त्याचे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते असल्याचे समोर आले होते. त्याच्या पासबुकवर त्याचे नाव रामराव शेषराव बिराजदार असे आहे. त्यावर त्याचा पत्ता घुग्गी (सावंगी) असा आहे. हा व्यक्ती गजानन महाराजांचा पेहराव करून नागरिकांच्या धार्मिक भावनांना आकर्षित करतो.हा व्यक्ती कुठून आला या संदर्भात त्याला वारंवार विचारणा केल्यानंतर अखेर त्या व्यक्तीचा शोध लागला आहे. हा व्यक्ती आज सकाळी साडेअकरा वाजता च्या दरम्यान शेगाव तालुक्यातील जवळा येथून स्वतःची सायकल घेऊन तेथून रवाना झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.