मलकापूर अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा आक्रोश; "दे के अपने खातेदारो को दुख, क्या मिलेगा तुझे चैनसुख..!"
Dec 17, 2023, 09:16 IST
छत्रपती संभाजीनगर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार,भाजप नेते चैनसुख संचेतीवर वाढदिवशी मलकापूर अर्बन बँकेच्या खातेदारांनी तोंडसुख घेतले. काहींनी शिव्याछाप दिल्या, काहींनी आमच्या लेकरांचा तळतळाट लागेल म्हटले. छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या शाखेसमोर ठेवीदारांनी चांगलाच आक्रोश केला.
जाहिरात 👆
मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. अनेक ठेवीदारांचे पैसे यात गुंतलेले आहेत. त्यामुळे ठेवीदार त्रस्त आहेत. मलकापूर अर्बन चे अध्यक्ष चैनसुख संचेतीच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरातील गुलमंडी शाखेसमोर ठेवीदारांचा जमाव जमला. यावेळी संचेतींच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. ठेवीदारांच्या हातातील बॅनर वरील मजकूर लक्ष वेधणारा होता. " दे के अपने खातेदारोको दुख, क्या मिलेगा तुझे चैनसुख" असे बॅनर वर लिहिलेले होते.
ठेवीदारांचा आक्रोश...
ठेवीदार पांडुरंग सोळंके हताश होऊन बँकसमोर उभे होते. "साहेब मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो,माझे पैसे परत करा हो... मला मेंदूविकाराचा आजार जडलाय, बायकोला डायलीसीस ला न्यावे लागते..हातात पैसे नाही...आयुष्याची जमापुंजी मलकापूर अर्बन बँकेत अडकून पडलीय..आता म्हातारपणात काय करू तुम्हीच सांगा साहेब.." अशी विनवणी ते करीत होते. त्यांच्याकडे पाहून उपस्थित पत्रकार , नागरिकांचे हृदय हेलावले...