मलकापूर बाजार समितीचे व्यवहार २९ नोव्‍हेंबरपर्यंत बंद!

शेतकरी अडचणीत, मलकापूर अर्बन बँकेवरील निर्बंधाचा परिणाम
 
 
file photo

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रिझर्व्ह बँकेने मलकापूर अर्बन बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादल्याने व्यापारी अडचणीत आले आहेत. मलकापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या व्यवहारावरही यामुळे मोठा परिणाम झाल्याचे आज, २६ नोव्‍हेंबरला दिसून आले. आजपासून २९ नोव्हेंबरपर्यंत मलकापूर बाजार समिती बंद ठेवण्यात येणार आहे.

मलकापूर बाजार समितीतील बहुसंख्य व्यापारी व अडत्यांचे खाते हे मलकापूर अर्बन बँकेमध्ये आहेत. मात्र रिझर्व्ह बँकेच्या निर्देशामुळे खात्यातून केवळ १० हजार रुपये काढण्याची मर्यादा असल्याने  शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. शेतमालाच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारांसाठी मलकापूर अर्बनच्या खात्याचा वापर करता येणार नसल्याने अडते आणि व्यापाऱ्यांनी नवीन बँकेच्या खात्यासाठी धाव सुरू केली आहे. बाजार बंद झाल्याने शेतकरीही हवालदिल झाला आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत यावर तोडगा निघेल, असा विश्वास बाजार समिती प्रशासनाला आहे.