पूर आलेल्या नदीत उतरणे जीवावर बेतले , दाम्पत्याच्या 'असा' झाला शेवट ! मलकापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना..

 
Hnvc

मलकापूर (स्वप्निल आकोटकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पूर आलेल्या नदीत उतरणे मलकापूर तालुक्यातील एका दाम्पत्याच्या जीवावर बेतले. पुरात वाहून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल १० जुलैच्या पहाटे उघडकीस आली. यातील पतीचा मृतदेह मलकापूर तालुक्यातील देवधाबा गावातून दूर अंतरावर आढळून आला. संपूर्ण गावासह तालुक्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विमल सुभाष शिंदे (५० वर्ष), सुभाष ब्रह्मा शिंदे असे मृत जोडप्याचे नाव आहे. हे दोघे मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील रहिवासी आहे. ९ जुलै रोजी कामानिमित्त विमलबाई शिंदे ह्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणकाझी येथे गेल्या होत्या. दरम्यान, देवदाबा परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने पती सुभाष शिंदे हे पत्नी विमल बाईला आणण्यासाठी दुचाकीने हिंगणकाझी येथे गेले. संध्याकाळी शिंदे दांपत्य घराकडे परतत असताना, व्याघ्रा नदीला पूर आला. त्यामुळे त्यांनी मोटरसायकल नदीकाठी ठेवली आणि नदीच्या पात्रातून गावाकडे जाण्यास निघाले. पुराच्या पाण्याचा लोंढा आल्याने विमलबाई पाण्यासोबत वाहून जात असल्याचे बघताच सुभाष शिंदे यांनी पुरात उडी घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, असता तेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. परिसरातील शेख कलीम यांनी पुराच्या पाण्यात उडी घेऊन विमलबाई यांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. 
  दरम्यान , हिंगणकाझीचे पोलीस पाटील विनोद फासे यांनी पोलिसांना माहिती दिली. मलकापूर ग्रामीण पोलीस, आणि महसूल विभागाचे कर्मचारी तसेच आपत्ती बचाव पथक यांनी घटनास्थळ गाठले. रात्री उशिरापर्यंत सुभाष शिंदे यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. काल १० जुलैच्या पहाटे घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर निंभोरी गावानजीक सुभाष शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी मलकापूर ग्रामीण पोलीस यांना कळविण्यात आले. पोलिसांसह महसूल विभागाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. सुभाष शिंदे यांचा मृत्यदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर शासकीय रुग्णालयात रवाना केला.