खामगाव बसस्थानक बनले भुरट्या चोरट्यांचा अड्डा! एकाच दिवशी चार प्रवाशांचे मोबाईल लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

 

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगाव बस स्थानक परिसर भुरट्या चोरट्यांचा अड्डा बनला आहे. कारण एकाच दिवशी या बसस्थानकावरून तब्बल ४ प्रवाशांचे मोबाईल लंपास करण्यात आल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

येथील बसस्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. या गर्दीचा फायदा घेवून चोरटे मंगळसूत्र, मोबाईल, खिश्यातून पैसे काढणे, खिसे चाचपडणे अश्या घटना नेहमीच उघड झाल्या आहेत. गेल्या आठवड्यातच एका महिलेच्या पर्समधून रोख व एटीएम कार्ड लंपास केले होते. त्या महिलेला बसस्थानकावरच महिला पोलीसने पाठलाग करून पकडले होते. ही घटना ताजी असतांनाच ११ एप्रिल रोजी सुनिल रामेश्वर ताठे रा. बुलढाणा, अनिकेत कैलास घाटोळे रा. अकोला, मो. हारीस मो. जाबीर रा. लोहारा व प्रथमेश सुनिल गडकर रा. शेगाव या चौघांचेही मोबाईल लंपास करण्यात आले आहेत. त्यामुळे या चौघांनीही खामगाव पोलीस स्टेशन गाठून एकत्रितरित्या तक्रार केली आहे. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याआधी आणि आता उघडकीस आलेल्या अनेक घटनांनी खामगाव बस स्थानक परिसर भुरट्या चोरट्यांचा अड्डा बनला आहे.