पूरग्रस्त तालुक्यातील संकटग्रस्तांना जयश्री शेळकेंनी दिला दिलासा! नुकसानीची केली पाहणी, अधिकाऱ्यांशी चर्चा
अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी २४ जुलै रोजी पाहणी केली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना दिलासा दिला. शासनाने कुठलेच निकष न लावता नुकसानग्रस्तांना सरसकट तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली.
अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील ७२ हजार ४६४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून २४ गावांना फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे ४ हजार ३८५ घरांची पडझड झाली तर २०३ गुरे दगावले आहेत. मोठ्या प्रमाणावर धान्याचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जयश्री शेळके यांनी २४ जुलै रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड, वडशिंगी, आसलगाव, जळगाव येथे तर संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल, अकोली, एकलारा, सोनाळा, टूनकी, बावनबीर येथे भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. पुरात वाहून मृत्यू झालेल्या एकलारा येथील मधुकर धुळे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव डॉ.स्वाती वाकेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, तालुका उपाध्यक्ष सतीश टाकळकर, माजी सरपंच श्रीकृष्ण दातार, सरपंच प्रतिभा इंगळे, निलेश सोळंके, भारती आस्वार, डांबरे ताई, माजी ग्रा. पं. सदस्य राजू राठोड, माजी सरपंच संतोष टाकळकर, शेख जलील, बाजार समिती माजी संचालक बळीराम धुळे, सेवादल तालुकाध्यक्ष शिवकुमार गिरी, उपसरपंच शेख सद्दाम, माजी उपसरपंच प्रकाश साबे, मनोज वाघ, मुरलीधर उमरकर, श्रीराम आढाव यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.