चिमुकलीवरील बलात्कार प्रकरणी जयश्रीताई शेळके आक्रमक! "त्या' नराधमास कठोर शिक्षा देण्याची केली मागणी;म्हणाल्या, आरोपी अल्पवयीन म्हणून त्याला दयामाया दाखवू नका!

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना पाठवले निवेदन
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बोराखेडी पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या एका गावातील अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी २४ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांकडे केली. 
जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीमधील एका गावात २३ नोव्हेंबर रोजी दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गावातील नराधम तरुणाने अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने पडक्या घरात नेऊन त्याने हे दुष्कृत्य केले. बराच वेळ झाल्यावरही बालिका घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिचा शोध घेतला असता हा प्रकार समोर आला. चिमुकलीच्या शरीरातून रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.    
  पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस अटक केली आहे. मात्र एवढ्यावर जमणार नाही. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला दयामाया दाखवली जात असेल तर हे चुकीचे आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तेंव्हाच त्या चिमुकलीला न्याय देता येईल. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील एका ५० वर्षीय व्यक्तीने सहा वर्षीय चिमूकलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तर १२ मे २०२३ रोजी रोजी चिखली तालुक्यातील रोहडा येथे सहा वर्षीय चिमूकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जिल्ह्यात घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना कुठे तरी आळा बसला पाहिजे. 
राज्यात महिला अत्याचारात वाढ
राज्यात अलीकडे महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. याकडे गृहखाते गांभीर्याने बघायला तयार नाही. बुलडाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीतील गावात चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना अत्यंत घृणास्पद आहे. मा. गृहमत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे. आरोपी अल्पवयीन जरी असला तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी केली.