उद्यापासून खामगावात जगदंबा उत्सवास प्रारंभ! दहा दिवस चालणार उत्सव; उद्या "या" वेळेत दर्शन राहणार बंद! वाचा कसा आहे कार्यक्रम...

 

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव उद्यापासून जगदंबा उत्सवास प्रारंभ होणार आहे. हा उत्सव दहा दिवस चालणार आहे.

संपूर्ण देशभरात खामगावचा हा उत्सव प्रसिद्ध आहे. खामगाव शहर, परिसरात साजरा होणाऱ्या मोठ्या देवीच्या शांती उत्सवाला उद्या २८ ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार आहे. मोठ्या देवीची स्थापना सकाळी ९ वाजता होणार आहे. खामगाव शहर, परिसरात जगदंबा मातेचा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या देवीची पूजाअर्चा करून स्थापना करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे २८ ऑक्टोबर चे दुपारी ३ ते २९ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजेपर्यंत दर्शन बंद राहणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचे वितरण होणार आहे.५ नोव्हेंबर रोजी  सत्यनारायण प्रसादाचे वितरण होईल, ६  नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जगदंबा मातेची आरती होऊन, विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. अशी माहिती श्री जगदंबा सार्वजनिक मोठी देवी उत्सव मंडळाचे विश्वस्त बळीराम सूर्यभान खंडारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.या उत्सवात राज्यासह देशभरातून भाविक सहभागी होतात. जगदंबा उत्साहामुळे खामगाव शहराला पुढील दहा दिवस यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.