म्‍या वाघ पाहिला...खामगाव एमआयडीसीतील महिलेचा दावा!

पुन्हा भरली धडकी!! (पहा व्हिडिओ)
 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४ डिसेंबरपासून खामगावकरांना धडकी भरवणारा वाघ गायब झाल्याची चर्चा असतानाच आज, २१ डिसेंबर रोजी तो पुन्हा अवतरल्याची चर्चा पसरली. खामगावच्या एमआयडीसी परिसरात मजुरी करणाऱ्या महिलेने वाघ पाहिल्याचा दावा केला. त्याच परिसरात सायंकाळी एका बकरीचे शरीर जनावराने अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत दिसून आल्याने वाघोबावर संशय निर्माण झाला. यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्याशी बुलडाणा लाइव्हने संपर्क केला असता, सध्या बकरीची शिकार वाघानेच केल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. मात्र आमची टीम वाघाचा शोध घेत आहे, असे त्यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ ः

खामगाव शहरातील गाडगेबाबानगर भागात ४ डिसेंबरला एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाघ दिसून आला होता. त्यानंतर वनविभागाच्या बुलडाणा आणि अमरावती येथील रेस्‍क्‍यू पथकांनी तब्बल ६ दिवस वाघाचा रात्रंदिवस शोध घेतला. मात्र म्या पहिला, म्या पहिला... असा दावा करण्याव्यतिरिक्त वाघाच्या अस्तित्वाचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नव्हते.

ट्रॅप कॅमेरे लावूनही वाघ त्या कॅमेऱ्यांत अडकला नसल्याने खामगाव सोडून तो गेला असावा, असे बोलले जात होते. शेगाव तालुक्यातील काही नागरिकांनी सुद्धा वाघ दिसल्याचा दावा केला. मात्र ठोस पुरावे मिळालेच नसल्याने वनविभागातील अधिकारी, कर्मचारी हैराण झाले होते.

आज २१ डिसेंबर रोजी एमआयडीसीत काम करणाऱ्या आशा भिसे या महिलेने वाघ दिसल्याचा दावा केला. याच परिसरात एका बकरीची शिकार सुद्धा झाल्याचे दिसून आल्याने वाघोबानेच तिची शिकार केल्याची चर्चा सुरू झाली. आमदार आकाश फुंडकर यांनीसुद्धा एमआयडीसी परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वृत्त लिहीपर्यंत वनविभागाचे अधिकारी नेहमीप्रमाणे वाघाचा शोध घेत असल्याचे दिसून आले.