घराला आग, महिलेचा संसार उघड्यावर!; मोताळा तालुक्‍यातील घटना

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आग लागून घरातील सर्व सामान खाक झाले. घरात बांधलेले एक बोकूडही आगीत होरपळून मृत्‍यूमुखी पडले. ही घटना मोताळा तालुक्‍यातील कोल्ही गवळी येथे २१ जानेवारीच्या पहाटे चारच्या सुमारास घडली. कपडे, अन्‍नधान्य खाक होऊन सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठ्यांनी पंचनामा केला असून, या महिलेला शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
धामणागाव बढे पोलीस ठाण्यात जिजाबाई रमेश पवार (५०) यांनी तक्रारही दिली आहे. जिजाबाई यांना दोन मुले असून, मुलगा राष्ट्रपाल व सुनेसह त्‍या कुडाच्या घरात राहतात. दुसरा मुलगा धम्मपाल मजुरीसाठी दोन महिन्यांपासून मुंबईला गेलेला आहे. त्यांच्याकडे लहान मोठ्या सहा बकऱ्या आहेत. जिजाबाई घरातच बकऱ्या बांधतात. २० जानेवारीला सायंकाळी बकऱ्या घरात बांधून जेवण करून हे कुटुंब झोपले होते. पहाटे चारला अचानक घराला आग लागल्याचे जिजाबाईंच्या लक्षात आले. हे कुटुंब सुरक्षित घराबाहेर पळाले. आरडाओरड केल्याने ग्रामस्‍थ मदतीसाठी धावून आले. सर्वांनी मिळून आग विझवली. तोपर्यंत बकऱ्या घराबाहेर काढल्‍या. मात्र एक बोकूड होरपळून मृत्‍यूमुखी पडले. चारही बाजूंनी घर जळाले असून, घरातील संपूर्ण सामान जळून गेले आहे.