अतिवृष्टीने जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! घाटाखाली २४४ गावांना फटका, ९२ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान..

 
बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बुलडाणा जिल्ह्यात घाटाखालील भागात १८ ते २० जुलै दरम्यान अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. मलकापूर शहर व परिसरातील पूर परिस्थिती ओसरली असली  तरी २० महसूल मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीने २४४ गावांना जिल्ह्यात फटका बसला आहे. तब्बल ९२ हजार २१३ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज  प्रशासनाने सादर केला आहे.

जिल्ह्यात घाटाखालील पाच तालुक्यात पावसाने  कहर केला होता. मलकापूर शहरासह तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. बुधवारी देखील ५ मंडळामध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली.  तब्बल ९२ हजार २०४ हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाले. सोबतच ९ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. कापूस सोयाबीन, मका, तूर, मुग व उडीद पिकांचा नुकसानीमध्ये समावेश आहे.

१८ ते २० जुलै दरम्यान झालेल्या पावसाचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या यंत्रणेने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान शेगाव तालुक्यात झाले आहे. शेगावमध्ये ७७ गावे बाधित झाले असून ३९ हजार ७२७ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ नांदुरा तालुक्यात ७२ गावांमध्ये ३४ हजार ५५० हेक्टर, मलकापूर तालुक्यात ७८ गावांमध्ये १७ हजार ५३७ तर जळगाव जामोदमध्ये १७ गावांमध्ये ३९० हेक्टरमध्ये खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यानुसार २४४ गावांमध्ये ९२ हजार २०४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ९ हेक्टर क्षेत्रावरील जमीन खरडून गेली आहे.   

घाटाखालील मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या पाच तालुक्यातील वीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती.  दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या दमदार पावसाने लाखों शेतकऱ्यांना दिलासा असा विश्वास असतानाच अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर  देखील दाटला आहे.