आरोग्यसेवक पदाची नोकरी लावून देतो म्हणे, अन् ३ लाख ८८ हजार घेवून खोटे नियुक्ती पत्र देवून गेला!खामगाव तालुक्यातील सोपान चौके, विश्वनाथ चौके विरुद्ध गुन्हा दाखल!

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 'तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचे कार्ड असेल तर तुमच्या मुलाला आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देतो ' असे सांगत ३ लाख ८८ हजार रुपये घेवुन खोटे नियुक्ती पत्र देवून एकाने फसवणूक केल्याची घटना खामगाव तालुक्यातील दुधा गावात उघडकीस आली.
झाले असे की, समाधान सदाशिव पांढरे (४०वर्ष)( रा. दुधा ता.खामगाव जि.बुलडाणा) यांना विश्वनाथ किसन चौके ( रा. दुधा ता.खामगाव जि.बुलडाणा) याने तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचे कार्ड असेल तर तुमच्या मुलाला आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावून देतो, असे म्हणत समाधान पांढरे यांच्याकडून दारिद्र्य रेषेचे कार्ड घेतले. ९ ते २० ऑटोबर २०२३ दरम्यान नगदी २ लाख ९८ हजार रुपये पांढरे यांनी विश्वनाथ चौके यांना दिले होते. बाकी ९० हजार रुपये ऑनलाइन पाठविले. असे एकूण ३ लाख ८८ हजार रुपये दिले. सोपान दिगांबार चौके (रा.पेडका ता.खामगाव जि.बुलडाणा) याने पांढरे यांच्या मुलाला आरोग्य सेवक पदाचे नियुक्तीपत्र दिले होते. मात्र मिळालेले नियुक्ती पत्र खोटे असल्याचे पांढरे यांच्या लक्षात येताच आपली फसवणूक झाली असल्याचे समाधान पांढरे यांच्या लक्षात आले. त्यांनी २१ मे २०२४ रोजी हिवरखेड पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी विश्वनाथ चौके व सोपान चौके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय सुरेश रोकडे करीत आहेत.
विशेष म्हणजे सोपान चौके याने याआधी सुद्धा अनेकांची फसवणूक केली आहे.खामगाव ग्रामीण पोलिसात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.