राजकारण ते पाऊस, पीक पाणी ! बहुप्रतिक्षित भेंडवळचे भाकीत काय ? बातमीत वाचा..
May 11, 2024, 10:39 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावातील घटमांडणीचे भाकीत आज शनिवारी, ११ मे रोजी पहाटे जाहीर करण्यात आले. ३५० वर्षाच्या परंपरेनुसार पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला घट मांडणी केल्या जाते. पाऊस, पीक, हवामान, देशाची आर्थिक स्थिती , राजकारण, संरक्षण, सामाजिक परिस्थिती यांवर भाकीत केले जाते. घटमांडणी नंतर झालेल्या बदलावरून अंदाज वर्तवण्यात येतो. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट मांडणी करण्यात आली.
घटमांडणीनंतर आज पहाटे बहू प्रतीक्षेत भाकीत जाहीर करण्यात आले. त्यानुसार, मान्सून प्रारंभी कमी प्रमाणात पाऊस असेल, जुलै महिन्यात साधारण तर ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल, मानसून अखेरीस अर्थात सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडणार आहे. खरीप पिके साधारण राहतील, रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगले राहील, पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पिकांची नासाडी देखील होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजकारणाचे भाकीत काय?
आचारसंहिता सुरू असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही. शिवाय त्याआधी कुठलीही राजकीय भविष्यवाणी केल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असा इशारा अनिस कडून देण्यात आलेला होता. राजकीय भविष्यवाणी केली नसली तरी, राजा कायम असल्याच्या अंदाजाची चर्चा सुरू आहे.
भेंडवळच्या भविष्यवाणी चे महत्व काय?
भेंडवळ येथे सुमारे ३५० वर्षांपासून घटमांडणीची प्रथा आहे. घट मांडणी नंतर झालेल्या बदला मुळे वर्तवण्यात येणाऱ्या अंदाजावर बहुसंख्य शेतकऱ्यांचा विश्वास आहे. अंदाजानुसार सर्व बदल घडतात असे शेतकरी मानतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच भेंडवळच्या भाकिताला शेतकऱ्यांचे विशेष महत्त्व आहे.