भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, महिला गंभीर जखमी; शेगाव शहरातील घटना
Jan 29, 2022, 20:01 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. शेगाव शहरातील एमएसईबी चौकात आज, २९ जानेवारीच्या दुपारी तीनला ही घटना घडली. कल्पना शेषराव धोरण (४२, रा. चिंचपूर, ता. मोताळा) असे अपघातात गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. तिचे पती किरकोळ जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एमपी ०९ एचएच २२७० क्रमांकाचा ट्रक खामगावकडे जात असताना आठवडे बाजारातून एमएसईबी चौकाकडे येणाऱ्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात कल्पना धोरण या गंभीर जखमी झाल्या तर त्यांचे पती शेषराव धोरण किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर महिलेच्या नातेवाइकांनी ट्रकचे वायरिंग तोडल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध बराच वेळ उभा होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.