विजेच्या तारा शेतात लोंबकळल्या; महावितरणला कामांसाठी मुहूर्त मिळेना! पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांचे हाल.. खामगावच्या पातोंडा शिवारातील प्रकार..!

 
वजक

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या पंधरा दिवसा आधी झालेल्या वादळामुळे पातोंडा शिवारातील शेतात जाणाऱ्या मुख्य लाईनच्या तारा लोमकळत पडल्या आहेत, मात्र अजूनही प्रशासन त्या लोमकळत पडलेल्या तारा दुरुस्त करण्याचं नाव घेत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मागील १५ दिवसांआधी खामगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचाच फटका महावितरणला सुद्धा बसला होता. अनेक ठिकाणी मोठ - मोठे झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पातोंडा शिवारात सुद्धा झाडे पडल्याने बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होऊन,विद्युत तारा जमिनीवर लोमकळत आहेत. पातोंडा शिवारातील महादेव भुसारी, सुनील सुलताने यांच्या शेतात जाणाऱ्या मुख्य लाईनच्या तारा गेल्या पंधरा दिवसांपासून जमिनीवर लोमकळत आहेत मात्र अजूनही प्रशासन त्या दुरुस्त करण्याचं नाव घेत नसल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. शेतकऱ्यांना शेती पेरावी लागते मात्र अशा लोमकळलेल्या तारांचा चुकून झटका शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, मजुरांना किंवा जनावरांना लागल्यास इथं अपरिचित घटना घडू शकते. त्यामुळे या लोमकळत असलेल्या तारा लवकरात - लवकर संबंधित महावितरण वाल्यांनी दुरुस्त करून भविष्यात होणाऱ्या घटनेला आळा घालावा. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.