एकतर घरकुल द्या नाहीतर बायको द्या! संग्रामपूरात ३० वर्षाच्या तरूणाची शासनाकडे अजब मागणी; म्हणाला, घरकुलाच्या यादीत माझा ३५ वा नंबर, ५ वर्षात गावात ५ घरे झाली, मग मला काय म्हातारा झाल्यावर देता काय..

 
संग्रामपूर(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर पंचायत समितीच्या कार्यालयात एका ३० वर्षीय तरुणाने बिडीओंना भेटून एक अजब मागणी केली आहे. घर नसल्याने बायको मिळत नसल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. त्यामुळे एकतर आपल्याला घरकुल द्यावे नाहीतर बायको द्यावी अशी मागणी तरुणाने केली आहे. संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथील अंकुश नत्थुजी कड या तरुणाने लक्षवेधी मागणी केली आहे.
 अंकुश च्या म्हणण्यानुसार त्याचे नाव घरकुलाच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर आहे. गेल्या ५ वर्षात घरकुल योजनेतून गावात केवळ ५ घरांचे बांधकाम झाले.त्यामुळे माझा ३५ वा नंबर येईपर्यंत मी म्हातारा होईल, तेव्हा घर देता काय ? असा सवाल अंकुशने बिडीओंना दिलेल्या निवेदनात केला आहे.
   आम्हाला घर नसल्याने गावातील लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. ३० वर्षांचे वय होऊनही घर नसल्याने आम्हाला कोणी पोरगी देईना, ज्या गतीने घरकुल योजनेची कामे होत आहेत, त्या गतीने ३५ वा नंबर यायला अजून ३० -३५ वर्षे लागतील. तोपर्यंत मी म्हातारा झालेलो असेल. त्यामुळे एकतर घरकुल द्या नाहीतर बायको द्या अशी मागणी अंकुशने सरकारकडे केली आहे. सरकारने मागणीची दखल घेतली नाही तर जीवाचे बरेवाईट करेल असेही अंकुशने माध्यमांशी बोलताना सांगितले.