चोरट्यांना पेरणी करायची व्हती? कृषी केंद्र फोडले अन्.. शेगावची घटना
Jul 2, 2024, 09:45 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेगाव शहरासह परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आधी दुचाकी चोरींचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले होते. आता चोरट्यांनी कृषी केंद्रालाच टारगेट केल्याचे दिसत आहे. रातोरात शेगाव शहरातील एक कृषी केंद्र फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल सोमवारी उघडकीस आली.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कृषी केंद्र फोडून अज्ञात चोरट्याने हजारोंचा मुद्देमाल लंपास केला. झाडेगाव येथील रहिवासी नंदकिशोर रमेश पाटील यांनी याप्रकरणी शेगाव पोलिसांत तक्रार दिली. १ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडण्या करता ते गेले होते. दुकानासमोर काही कागदपत्रे पडलेली त्यांना दिसून आली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी दुकानाचे कुलूप उघडले तर दुकानाची पाहणी करत असताना मागील बाजूची लाकडी खिडकी त्यांना तुटलेली दिसली. एक जुना वापरता एक हजार किमतीचा फोन तसेच गल्ल्यात ठेवलेली नगदी एकूण १४ हजार पाचशेची रोकड, व विक्रीसाठी ठेवलेले कोरोजन कंपनीची फवारणी औषधपेटी किंमत ४५ हजार असा एकून ६० हजार ५०० रुपयांचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांना समजले. त्यानंतर शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात चोरटे विरोधात गुन्हा दाखल केला असून शोध सुरू करण्यात आला आहे.