कार्तिकी एकादशीनिमित्त संत नगरी शेगावात भक्तांची मोठी गर्दी! आज दिवसभरात शेगावात भरगच्च कार्यक्रम,नगर परिक्रमा होणार! समाधी दर्शनासाठी लागतोय "एवढा" वेळ..

 
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील, संत नगरी शेगाव येथे कार्तिकी एकादशीनिमित्त हजारो भाविक, आज शेगावात दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त दिवाळीनंतर दरवर्षी पंढरपूरला, विठ्ठलाच्या दर्शनाकरिता लाखो भाविक पंढरपूरला जात असतात. परंतु जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ,ते भाविक मात्र विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथे, दर्शनाकरता येतात. 
आज सकाळपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनाकरिता गर्दी केली आहे. सकाळी ५ वाजता काकडा आरती झाली, तर सात वाजता मुख्य आरती झाली असून, दुपारी श्रीचां रजत मुखवटा पालखी सोहळा, व नगर परिक्रमा होणार आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या समाधी दर्शनासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत असून,मुखदर्शनाकरिता वीस मिनिटांचा वेळ लागत आहे.